मागण्या नव्हे, जरांगे ‘जोक’ करतात!

164

 

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांचा टोला

आई ओबीसी समाजाची असल्यास तसे जात प्रमाणपत्र मुलांना दिले जावे, अशी नवी मागणी आता मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ही मागणी नाही तर त्यांनी केलेला जोक आहे. असले जोक आता ते अधिकच करायला लागले आहेत, असा टोला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूकर यांनी केला आहे.
जरांगे पाटील यांच्या नव्या मागणीच्या अनुषंगाने राजूरकर म्हणाले, जात प्रमाणपत्रासाठी आई हा निकष मान्य केल्यास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या प्रवर्गासाठी कुठला नियम लावला जाईल. या प्रवर्गातील आई असल्यास त्यांच्या मुलांनाही हे आरक्षण मिळणार काय, असा सवालही त्यांनी केला आहे.
जरांगे हे मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षणाची मागणी करीत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सुरुवातीपासून या मागणीला विरोध केला. चंद्रपुरात कार्यकर्त्यांनी २१ दिवस अन्नत्याग आंदोलन केले. याची दखल घेत सरकारने २९ सप्टेंबरला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्री, मुख्य सचिव व ओबीसी संघटनांची बैठक घेतली. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देणार नाही, असे सांगितले. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात येऊन रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सोडविले होते. मागण्यापूर्तीच्या अनुषंगाने लेखी पत्रही दिले होते. हे सारे घडत असतानाही जरांगे पाटील आता नवी मागणी करू लागले आहेत. त्यांच्या मागण्यांचा खेळ संपण्याची चिन्हे नाहीत. त्यांनी सरकारकडे आरक्षणाची मागणी खुशाल करावी. तसे आरक्षणही लढा देऊन मिळवावे. आमचा विरोध ओबीसींमधून आरक्षणाला आहे. तो अजूनही कायम आहेत. हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार काय भूमिका मांडते याकडे लक्ष लागून आहे. समितीने आपला अहवाल दिला आहे. या अहवालातील तथ्यही लवकरच बाहेर येईल. ओबीसी समाज या अहवालातील बाबींकडे लक्ष ठेवून आहे, असेही सचिन राजुरकर यांनी मटले आहे.