अंमलबजावणी होत नसलेल्या ‘पत्रकार संरक्षण कायद्या’ची होळी

258

पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांचा पत्रकार संघटनांकडून जाहीर निषेध

सावली (प्रतिनिधी): राज्यभरात गेल्या कांही काळात पत्रकारांवरील हल्ल्यांचा, धमकावण्याचा तसेच हिंसक कृत्यांमध्ये वाढ झाली असून याविरोधात विधीत करण्यात आलेला ‘पत्रकार संरक्षण कायदा’ अंमलबजावणी अभावी कुचकामी ठरला असून एक तर या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा अन्यथा कायदा जाळून टाका अशा तीव्र शब्दात संताप नोंदवत सावली तालुका पत्रकार संघाच्या वतीने ‘पत्रकार संरक्षण कायद्या’ची प्रत जाळून निषेध व्यक्त केला. सदरचे निषेध आंदोलन आज दि. 17 रोजी दुपारी 1 वाजता करण्यात आले.

यांनी पत्रकार संरक्षण कायद्याची निर्मिती झाल्यापासून राज्यभरात पत्रकारांवर हल्ल्याच्या सुमारे सव्वादोनशे घटना घडल्या असून त्यापैकी केवळ 37 घटनांमध्येच पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतूदीन्वये गुन्हे नोंदविले गेले असल्याची माहिती दिली. तसेच मागील काळात पत्रकारांवरील हल्ल्यांच्या – हिंसक कृत्यांच्या घटना वाढल्या असून अशा घटनांमधील अपराध्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार दखलपात्र गुन्हा नोंदविणे गरजेचे होते परंतू बहुतांश प्रकरणात तसे न झाल्याने सदरचा ‘पत्रकार संरक्षण कायदा’ केवळ फार्स ठरत असल्याची खंत व्यक्त केली.

 

जळगांव जिल्ह्यातील पाचोरा येथील आमदार कैलास पाटील यांच्या समर्थकांकडून तेथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा दाखला देत सदर प्रकरणातही ‘पत्रकार संरक्षण कायद्या’च्या तरतुदीन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे सांगितले. सदरचा कायदा व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांविरोधातील हिंसाचार, हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याने शेवटी निषेध करण्यासाठी राज्यभरातील पत्रकारांना रस्त्यावर उतरण्याची आणि आंदोलनाचा पवित्रा घेण्याची वेळ आली असून शासनाने तातडीने पाचोरा प्रकरणात दखलपात्र गुन्हा नोंदवावा आणि राज्यभरात पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी केली.

 

सदरच्या आंदोलनात सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोम्मावार, माजी अध्यक्ष उदय गडकरी,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.षडाकांत कवठे,तालुका सचिव प्रकाश लोनबले,कोषाध्यक्ष सुनील बोमनवार, ज्ञानेश्वर सिडाम,परिमल डोहणे,राहुल रायपुरे आदी जण उपस्थित होते.