हरंबा,उपरी डोनाळा शेत शिवारात हत्तीचा धुमाकुळ;5 दिवसापासून हत्ती सावली वनपरिक्षेत्रात दाखल

313

सावली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या, व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रातील उपरी व शिर्शी वन बिटात येणाऱ्या , उपरी, डोनाळा,हरंबा शेतशिवरात हत्ती व वाघाने धुमाकूळ घातला असून हतीमुळे धान पिकाचे मोठे नुकसान होत असून वाघ या परिसरात दोन दिवसांपासून जंगल परिसराला लागून असलेल्या शेत शिवारात येत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर हत्ती हा गेल्या 5 दिवसांपासून या परिसरात भटकत आहे.हरंबा येथे हत्ती वैनगंगा नदी काठावरील एका बोटी चा नुकसान केला असून काही शेतकऱ्यांचे शेती व साहित्याचे नुकसान केले आहे. काल दिनांक 11 ला रात्री ७ वाजताच्या दरम्यान हत्ती डोनाळा येथील प्रवासी निवारा च्या बाजूने शेत शिवारात जात असताना तेथे उपस्थित नागरिकांनी पाहिले आणि त्याची मोबाईलमध्ये फोटो घेतली. आणि त्वरित वनविभागास कळविले. तर आज सकाळी ७ वाजताच्या दरम्यान डोनाळा येथील रहिवासी प्रकाश मानकुजी मेश्राम वय ४५ वर्ष हा शेताकडे धान पिकाचे शेतीला पाणी करण्यासाठी गेला असता त्याचे समोरासमोर अगदी दहा फूट अंतरावर वाघ दिसला .

त्या शेतकऱ्याने लगेच दुसऱ्या बाजूने पळ काढला आणि आपला जीव मुठीत घेऊन गावात आला. सदर घटनेची माहिती व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक सूर्यवंशी व बिट वनरक्षक सोनेकर यांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी डोनाळा येथे दाखल झाले. त्यांनी वाघाच्या हल्ल्यातून बचावलेल्या प्रकाश माणकुजी मेश्राम यांची भेट घेतली आणि विचारपूस केली. तेव्हा प्रकाशने कोणतीही इजा झाली नाही असे सांगितले. त्या नंतर डोनाळा शेतशिवारातील हत्ती ज्या मार्गाने शेतकऱ्यांच्या शेतातून गेला त्याचा मागोवा घेत शोधमोहीम सुरू केली आहे. जवळपास पाच सहा दिवसापासून या वन परिक्षेत्रात हत्तीने धुमाकूळ घातला असून शेतीचे मोठे नुकसान होत आहे तर दुसरीकडे वाघ हा गावाशेजारी फिरत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

 

हा हत्ती गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी वरून वैनगंगा नदी पार करून मुडझा मार्गे पाथरी ,गायडोंगरी, केरोडा, व्याहाड, उपरी, हरांबा , काढोली, डोनाळा इत्यादी गावातील शेतशिवरात भटकत आहे, मात्र वनविभागाचे निदर्शनात आलेला आहे. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे.
*रवी.एम. सूर्यवंशी ,क्षेत्र सहाय्यक उपवन परिक्षेत्र व्याहाड खुर्द*