वीज दरवाढ केल्याने महावितरणाचा वीजबीले जाळून निषेध..

409

.

वीज दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवू.!

पद्मशाली सखी संघमचा पुढाकार.!

*सोलापूर :*
महाराष्ट्र वीज वितरण महामंडळाने ४ – ५ महिन्यापूर्वी राज्यातील सर्व वर्तमानपत्रांतून महाराष्ट्रातील सर्व वीज ग्राहकधारकांना *’वीज दरवाढ’* करण्यात येत असून, त्याबाबत सूचना व हरकतींचे निवेदन देण्याचे आवाहन केले होते व त्यानुसार सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते, संस्था, अनेक वीज ग्राहकांनी वीज दरवाढ करु नये यासाठी ईमेलद्वारे निवेदने पाठवल्या होत्या. काहीजणांनी प्रत्यक्षात निवेदन व हरकती दिल्या होत्या, परंतु वीज वितरण महामंडळाने कोणत्याही वीज ग्राहकांच्या निवेदने किंवा सूचनांचा विचार न करता सरसकट साडे सतरा टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करून मंजूरी घेतली व वीज ग्राहकांची फसवणूक केली. केवळ नफा कमवण्याचे उद्देशाने सरसकट दरवाढ करून घरगुती आणि व्यवसायिक वीज ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली आहे.

या वीजदर वाढीबद्दल सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने नुकतेच वीज बिले जाळून निषेध व्यक्त करण्यात आले आहे. यासाठी श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेतला आहे. याप्रसंगी पद्मशाली सखी संघमच्या पदाधिकारी सचिवा ममता मुदगुंडी, सहसचिवा जमुना इंदापूरे सहखजिनदार ममता तलकोकूल, आणि सदस्या सुनिता निलम, दुर्गा रेस, निर्मला रेस, वंदना बंदगी, लक्ष्मी चिल्लाळ, शारदा दोमल, पुष्पावती पुला, सरस्वती नामा, वंदना गजेली,महेश्वरी गोरट्याल यांच्यासह आदी महिला उपस्थित होत्या.
———————
*चौकट*
राज्यात अगोदरच जीवनावश्यक वस्तूंचे भरमसाठ वाढ झाली आहे. यामध्ये भर म्हणून घरगुती आणि व्यवसायिक वीज दरात वाढ केल्याने अनेक नागरिक त्रस्त आहेत. महाराष्ट्रापेक्षा अन्य राज्यात वीज दर कमी आहे. याचाही सारासार विचार व्हावा. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी वीज दरवाढ कमी करुन जनतेला दिलासा द्यावा यासंदर्भात लवकरच मा. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन पाठवू आणि थेट ईमेल पाठवून देऊ, असेही पद्मशाली सखी संघमच्या सचिवा ममता मुदगुंडी यांनी सांगितल्या.
———————————————————–
*फोटो ओळ -* श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने वीज दरवाढ केल्याने महावितरणाचा वीजबीले जाळून निषेध व्यक्त करताना पदाधिकारी सचिवा ममता मुदगुंडी, सहखजिनदार ममता तलकोकूल, महेश्वरी गोरट्याल, सरस्वती नामा, दुर्गा रेस, वंदना गजेली.