चला करूया मातृभाषेचे संवर्धन …..

204

#writer #marathi #saoli #matrubhashadin
……………………………..
मराठी भाषा दिनविशेष
वृंदा संतोष
पगड़पल्लीवार सावली

………………………………
२७ फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक,नाटककार,कवी,ज्ञानपीठ पुरस्कार विजेते,लेखक वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस.
कुसुमाग्रज या टोपण नावाने त्यांनी कविता लेखन केले.आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे ते लेखक मानले जातात.
२७ फेब्रुवारी हा दिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्य विश्वात कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे स्थान अग्रस्थानी आहे. अंगभूत तेजस्वी प्रतिभेमुळे साहित्य क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कारासह प्रतिष्ठेच्या सन्मानाचे अनेक तुरे त्यांच्या शिरपेचात खोवले गेले आहेत. मराठी भाषेविषयी त्यांना असलेला कळवळा सर्वांना माहिती आहेच. पण मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी यासाठी देखील ते आग्रही होते.भाषेची त्यांनी केलेली सेवा आणि मराठी साहित्यामध्ये दिलेले मोलाचे योगदान विचारत घेता २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस २०११ पासून मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. आता हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जात आहे…
हा दिवस मराठी जनतेला अभिमानाचा वाटतो. कारण हा जागतिक “मराठी भाषा दिन” म्हणून साजरा केला जातो.’मायबोली’ या शब्दात मराठी भाषेबद्दल आपुलकी,आत्मसन्मान,सामावला आहे.
पाश्चात्त्य भाषा आपल्याला शिकावी लागते पण मायबोली आपल्या रक्तात, तनामनात असते.ज्यामुळे आपले संस्कार दिसून येते.म्हणूनच अशी ही मराठी भाषा प्रत्यक्ष व्यवहारात वापरणे,मराठी विषयी सुलभ ज्ञान देणे,समाजाला तिची उपयोगीता पटवून देणे,मराठी साहित्य प्रकार लोकांपर्यंत पोहोचवणे अशा गोष्टींनी भाषा टिकून राहते. या प्रयत्नासाठी आपण वचनबद्ध असले पाहिजे.
आपल्याला आपली ओळख व अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर भाषा टिकवणे,जपणे गरजेचे आहे.भाषा कोणतीही असो ते संस्काराचे आणि विकासाचे प्रभावी माध्यम आहे.आपले मत,विचार दुसऱ्यापर्यंत पोहचवणे महत्त्वपूर्ण आणि चांगले माध्यम म्हणजे भाषा होय.
या युगात मराठी भाषेचे संवर्धन करणे गरजेचे आहे.मराठी भाषा आपोआप शिकली जाते.कुठलीही भाषा शिकताना शब्दामुळे शब्दसंपत्ती वाढत जाते.सांगायचा मुद्दा हा की मराठी भाषा पुस्तकात पाहून शिकवली जात नाही.त्यासाठी कौटुंबिक,सामाजिक ,पुरक वातावरण गरजेचे आहे .आपण खरोखरच आपली मातृभाषा टिकावी म्हणून प्रयत्न करतोय का? असा प्रश्न पडतो.आपल्या मातृभाषेपासून आपण दुरावत आहोत,भाषेच्या शुद्धतेला आपण पारखे होत आहोत असे वाटते.
सध्याच्या परिस्थितीत आपली मातृभाषा समृद्ध कशी करायची.तिचा वापर व प्रसार कसा करायचा.आणि तिचे अस्तित्व अबाधित कसे राखावे.हे सुद्धा आपल्या समोर खूप मोठे आव्हान आहे.
खरं तर मातृभाषा हे शिक्षणाचे माध्यम असावे. कारण लहानपणापासून शिकल्यामुळे आपले विचार व्यक्त करणे सोपे जाते.मातृभाषा ही ज्ञानभाषा झाली तर शिक्षण सुलभ होईल.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माया मानतो मराठीमराठी ही केवळ मातृभाषा नाही तर ती एका संपन्न संस्कृतीची देणगी आहे. तिच्याविषयीचा अभिमान हा संस्कृतीच्या प्रवाहात कृतिशील दीप भेटूनच व्यक्त केला पाहिजे. साहित्यामध्ये मराठीचा अभिमान जागोजागी व्यक्त झालेला आहे. पहिलीपासून मराठीचे शिक्षण आग्रहाने झाले पाहिजे अशी सक्ती असायला पाहिजे. मराठी आपल्या आत्म्याची भाषा आहे हे लक्षात घेतले पाहिजे..
मातृभाषेतून अध्ययन व्हावे हा कुसुमाग्रजांचा आग्रह होता. ते अनेकदा म्हणायचे समाजाची प्रगती व क्रांती स्वभाषेच्या किनाऱ्यावरच पेरता येते. मुलांच्या कर्तुत्वाला उजाळा देण्याचे काम मातृभाषा करते. त्यामुळे मुलांना मातृभाषेवर प्रेम करायला शिकवा.
मराठी भाषेचा गोडवा गावा तेवढा थोडाच आहे. तो केवळ शब्दाने गाऊन चालणार नाही, तर कृतीतही आणायला हवा. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेचा हा ध्वज मजबूत हाताने फडकवला पाहिजे. तेव्हाच मराठी मातृभाषेला पुन्हा समृद्धीचे, वैभवाचे दिवस प्राप्त होतील,यात शंका नाही.
शाळेपासून तर कार्यालयीन कामकाजासाठी सुद्धा मराठी भाषेचा वापर करणे गरजेचे आहे.तेव्हाच ख-या अर्थाने आपल्या मराठी भाषेचे सक्षमीकरण झाले असे समजावे लागेल …..

मराठी भाषा दिनविशेष
वृंदा संतोष पगड़पल्लीवार सावली