पाणी करात सवलत द्या ; वंचित बहुजन आघाडीचे सावली नपला निवेदन

402

 

सावली  प्रतिनिधी :-

सावली शहरात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नवीन नळजोडणी देण्यात येत आहे. मात्र नगर प्रशासनाच्या तुघलकी धोरण व हमी पत्रातील जाचक अटी मुळे नागरिकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. नगरप्रशासनाने गृहकर व पाणी कराचा भरणा केल्याशिवाय नळ जोडणी मिळणार नाही असा अजब फतवा काढल्याने नागरिकांना नळ जोडणीसाठी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी शहर शाखेच्या वतीने नळ जोडणी साठी भरणा करण्यात येणाऱ्या करात सवलत देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना सादर केले आहे.

दोन वर्षापूर्वी कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे नागरिकांच्या हाताला काम नव्हते त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला होता. आता कसाबसा संसाराचा गाडा सुरळीत होत असतानाच नगर प्रशासनाच्या तुघलकी धोरणामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. तर मागील दोन ते तीन वर्षापासून नळाला पाणीच मिळाले नाही तर पाण्याच्या कराचा भरणा का करावा असाही सवाल नागरिकांनी केला आहे. यां कारणाने नगरप्रशासनाविषयी नागरिकात रोष व्यक्त होताना दिसत आहे. नगरपंचायत इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सर्वांना मोफत नळजोडणी करून मिळणार असे आश्वासन दिले होते.

मात्र नगर प्रशासनाच्या जाचक धोरणामुळे तत्कालीन पालकमंत्र्याचे आश्वासन हवेतच विरले काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने पाणी करात सवलत देण्यात यावी अन्यथा जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे दिलेला आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ कार्यकर्ते कांतीलाल बोरकर, शहर अध्यक्ष रोशन बोरकर, सुरेश सोमकुंवर, विलास बोरकर, सपना दुधे, ललिता मेश्राम, अरुणा सोमकुवर, लोकनाथ देवगडे, शालू रामटेके, चंद्रभागा गेडाम, प्रियंका गोगले, अंजिरा रामटेके, वनकर बाई, माजी नगराध्यक्ष विलास यासलवार, सामाजिक कार्यकर्ते राजू व्यास, मनोज धर्मपवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.