शौचालयाच्या मागणी साठी जि. प.शाळेचे विध्यार्थी पंचायत समितीवर धडकले…

123

बीडीओ ला दिले निवेदन;प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा पालकांचा आरोप

Saoli- Suraj Bommawar
सावली(सूरज बोम्मावार)

तालुक्यातील चकपेटगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शौचालय,संरक्षक भिंत व इतर भौतिक सुविधेच्या मागणीसाठी वर्ग 1 ते 4 चे विद्यार्थी व पालक आज सावली पंचायत समितीवर धडकले व भौतिक सुविधेच्या समस्या सोडवा अशी मागणी सावलीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे केली.

सध्या सावली तालुक्यात वाघाने धुमाकूळ घातलेला असून तालुका वासिया भयभीत झालेले आहेत. मागील आठवड्यात वाघाच्या हल्ल्यात तिघांचा बळी गेलेला आहे. दिवसेंदिवस तालुक्यात वाघाची दहशत वाढतच आहे. सावली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चकपेटगाव हे कोंडेखल ग्रामपंचायत अंतर्गत जंगल परिसरात असणारे गाव आहे. येथे जिल्हा परिषद शाळा असून 1 ते 4 पर्यंत वर्ग आहेत. सदर गाव हे जंगलात असून वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. चकपेटगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भौतिक सुविधांचा अभाव असून या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी जंगलात शौचास जात आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू शकते. याकरिता पालकांनी मागील ऑक्टोंबर महिन्यामध्येच शाळेला भौतिक सुविधा पुरविण्यासाठी संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने शेवटी सदरहू शाळेला मुत्रीघर, संरक्षण भिंत व शौचालयाची मागणीसाठी चकपेटगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पंचायत समितीला आले.व विध्यार्थी यांनी आपल्या समस्या बीडीओ सुनीता मरस्कोल्हे यांना सांगितले व मागणीचे निवेदन दिले.समस्या आठ दिवसात सोडवितो असे आश्वासन बीडीओ यांनी पालकांना दिले.

*बॉक्स*
बीडीओ अनभिज्ञ…चकपेठगाव चे विद्यार्थी हे दुपारच्या सुमारास थेट पंचायत समिती गाठत बीडीओ च्या कॅबिन मध्ये घुसले त्यामुळे हे मूल कुठले व कशासाठी आले या संदर्भात बीडीओ सुनीता मारस्कोले ह्या काही वेळासाठी भांबावल्या तसेच हा गाव कुठे आहे असा प्रश्न केला.दोन वर्षापासून बीडीओ असताना हि गावाची माहिती नसणे या बाबत उपस्थित पत्रकार यांनी आश्चर्य व्यक्त केले.मात्र उन्हात आलेल्या बालकांना बीडीओ यांनी बिस्कीट चे पुडे देवून खुश केले.

*बॉक्स*
सर्व पालकांनी लोकप्रतिनिधी तसेच बीडिओ यांना भौतिक सुविधा पुरविण्याबाबत निवेदन दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सध्या सावली तालुक्यात वाघाची दहशत असल्याने मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालक धस्तावत आहेत. त्यामुळे त्वरित भौतिक सुविधांची निर्मिती करावी.
– रेवनाथ भोयर सभापती शाळा व्यवस्थापन समिती

*बॉक्स*
सदर बाबीची गंभीर दखल घेत मी तात्काळ एमआरजीएस फंडातून शौचालय, मुत्रीघर, संरक्षण भिंत या भौतिक सुविधा पुरवण्यासाठी आदेश निर्गमित केलेले आहेत. येत्या आठवड्यात शौचालय व मुत्री घराचे बांधकाम सुरू करण्यात येईल. – सुनिता मरसकोल्हे
गट विकास अधिकारी पंचायत समिती सावली