स्व.प्रभाकरराव मामूलकर यांनी समाजाच्या सेवेसाठी आयुष्य खर्ची घातले

140

..

राजुरा…
राजकारणातील निष्ठावंत व्यक्तिमत्व म्हणून स्व.प्रभाकरराव मामुलकर यांची जनमानसात ओळख आहे. मामुलकरांनी आपल्या जीवनात सामाजिक दृष्टीकोन जोपासत अनेक समाजहिताच्या बाबी पूर्णत्वास नेल्याचे सांगून ते खरे लोकसेवक होते. या भागातील पिढीत शोषित समाजासाठी शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचे दालन खुले करण्याचे महान कार्य मामुलकरांनी केले.शोषित पीडित समाजासाठी, शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. राजकिय विचारधारा वेगळी असली तरी त्यांनी सर्वांचा सन्मान करणारे असामान्य व्यक्तिमत्व होते
असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी काढले.

माजी आमदार स्व. प्रभाकरराव मामूलकर यांच्या जयंती निमित्त राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयात शेतकरी मेळावा, सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे उद्घघाटन केंद्रीय राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते माजी खासदार नरेशबाबू पुगलिया होते. प्रमुख अतिथी माजी आमदार तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड.संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, मंडळाचे अध्यक्ष सुधाकर कुंदोजवार, माजी जि.प.सदस्य अविनाश जाधव, खुशाल बोंडे, दत्तात्रय येगीनवार, श्रीधर गोडे, प्राचार्य दौलत भोंगळे, ॲड.अरुण धोटे, अरुण निमजे, पांडुरंग जाधव, गजानन जुमनाके, गजानन गावंडे, राजू घरोटे, आबिद अली, आबाजी ढुमणे, साजिद बियाबानी, हवामान अभ्यासक पंजाबराव डख,प्राचार्य संभाजी वारकड , प्राचार्य जोसेफ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मामुलकर यांच्या पुतळ्याचे अनावरण, प्रेरणास्थळाचे लोकार्पण सोहळा , महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन, करियर गायडन्स केंद्राचे उद्घाटन व शेतकरी मेळावा संपन्न झाला. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी बदलत्या हवामानानुसार शेती करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले.
अध्यक्षस्थानाहून बोलतांना नरेशबाबू पुगलिया यांनी मामुलकर यांनी काँग्रेस पक्षात राहून राजकारण करताना सतत जनतेच्या कल्याणाचा ध्यास धरला असल्याचे सांगितले. त्यांनी समाज हिताचे अनेक प्रश्न सोडवून शेतकरी व गरीब नागरिकांना न्याय मिळवून दिल्याचे पुगलीया म्हणाले. याप्रसंगी पुगलिया यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल हंसराज अहीर यांचे स्वागत केले. अहिर यांच्या नियुक्ती बद्दल चंद्रपूर जिल्ह्याचा सन्मान असल्याचे आपल्या मनोगतातून माजी खासदार नरेशबाबू यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव अविनाश जाधव व संचालन आनंद चलाख आणि आभार प्रदर्शन उप प्राचार्य राजेश खेरानी यांनी केले. कार्यक्रमाला राजुरा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Photo..माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांची नियुक्ती इतर मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी झाल्याबद्दल पुगलीया यानी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.