अल्पावधीतच उखळला डांबरीकरण रस्ता ; सावली ते घोडेवाही रस्त्याची दुर्दशा

45

 

 

सावली ते घोडेवाही या रस्त्याचे दर्जोन्नतीकरण व डांबरीकरण करण्यात आले. मात्र अल्पावधीतच रस्ता उखळल्याने कामाच्या दर्जेदारपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील जनता करीत आहे.

 

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सावली ते घोडेवाही रस्त्याच्या दर्जोन्नतीकरण व डांबरीकरणाला मंजुरी मिळाली. रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात होऊन शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे दिसुन येत आहे. डांबरीकरण केलेला रस्ता उखळून गिट्टी बाहेर आलेली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेक अपघात होऊन प्रवासी जखमी सुद्धा झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

एक वर्षात डांबरीकरण रस्ता उखडला असेल तर त्या केलेल्या कामाची गुणवत्ता कशी असेल याची प्रचिती येते. संबंधित कंत्राटदार जेव्हा एवढे निकृष्ट दर्जाचे काम करतात तेव्हा त्यांना अभय कोणाचे अधिकाऱ्याचे की राजकीय नेत्याचे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आतापासून डांबरीकरण रस्ता उखडला असेल तर येणाऱ्या दिवसात या रस्त्याची काय अवस्था होईल याची कल्पना करता येते. त्यामुळे सावली ते घोडेवाही या डांबरीकरण रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील जनता करीत आहे.

बॉक्स
एक ते दीड वर्षातच सावली ते घोडेवाही रस्त्याची दुर्दशा झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि रस्ता त्वरित दुरुस्ती करून देण्यात यावा.
– चेतन रामटेके-उपसरपंच