ऐन दिवाळीच्या तोंडावर कामगाराचे वेतन थकीत

63

 

सावली (सौरभ गोहणे)

नगरपंचायतीच्या स्थापनेपासून शहरातील कचरा संकलनासाठी घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने मजूर लावण्यात आले आहेत. परंतु मागील तीन महिन्यांपासून या व्यवस्थापनेत काम करणाऱ्या मजुरांचे वेतन थकीत असल्याने मजुरांची दिवाळी अंधारातच जाणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वेतन त्वरित करण्यासाठी कामगारानी मुख्याधिकारी यांना कर निरीक्षक यांच्या मार्फतीने निवेदन दिलेले आहे.

 

सावली नगरपंचायत या ना त्या कारणासाठी वादात राहिलेली आहे. अनेक समस्या शहरात असताना अधिकारी व कर्मचारी आपापल्या मर्जीनुसार कामे करीत असल्याची जणमाणसात चर्चा आहे. त्यामुळे शहराचा विकास हा थांबलेला आहे. शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे काम जोमाने सुरू होते. परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणा मुळे कचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या मजुरांचे तीन महिन्याचे वेतन थकीत आहे. वेतन मिळावे म्हणून कामगारांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला असून येत्या काळात शहरातील घनकचरा रस्त्यावर टाकण्याशिवाय शहरवासीयांना पर्याय उरणार नाही अशा चर्चेला उधाण आले आहे. मात्र अशा गंभीर बाबीकडे नगर प्रशासन व पदाधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याने कामगारावर ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर उपासमारीची पाळी आलेली आहे.

*बॉक्स*
संबंधित कंत्राटदाराने मागील तीन महिन्यापासून कामगाराचे वेतन व प्रॉव्हिडंट फंड थकविलेले आहे. त्यामुळे कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. संबंधित कंत्राटदाराने कामगारांचे वेतन त्वरित अदा करावे अन्यथा कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी.
*सतीश बोम्मावार*
विरोधीपक्ष गटनेता नगरपंचायत सावली