दिले नादाॅं, तुझे हुवा क्या है ? आखीर, इस दर्द की दवा क्या है ?

112

दिल, कुठल्याही सहृदय माणसाचा जिव्हाळ्याचा विषय. कारण आपल्याला आवडणाऱ्या व न आवडणाऱ्या कुठल्याही गोष्टींची दखल घेणारं आपलं हे हृदय जो पर्यंत धडधडतय तोपर्यंतच सगळ्या या जीवनाच्या व्यापाला अर्थ उरतो. एकदा का हे बंद पडलं की उरतो तो केवळ निःश्वास. आपल्या हिंदी चित्रपट गीतांनीसुद्धा या हृदयाच्या स्पंदनाना सुरेल चालीत बांधलं. त्याचं थांबणं म्हणजे आपलं अस्तित्व संपणं व त्याची कल्पनासुध्दा भयावह वाटते. पण आज या जागतिक हृदय दिनी आपण आपल्या जिवंतपणाची साक्ष देणाऱ्या हृदयाविषयी जाणून घेऊया. २९ सप्टेंबर जागतिक आरोग्य संघटनेनं निर्धारित केलेला ‘ जागतिक हृदय दिवस ‘ या दिवसाच्या अनुषंगाने थोडं हृदयाच्या आजच्या अवस्थेबद्दल जाणून घेऊया.

 

हृदयाचं आरोग्य सुदृढ असणं आपल्या जिवंतपणासाठी अत्यंत आवश्यक आहे व त्याला सुदृढ ठेवणं बहुतांशी आपल्या जीवन शैलीवर अवलंबून आहे. हृदयरोगाने पिडीत किंवा कायम जीवनाला पारखे होणाऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता आपण आपल्या हृदयावर प्रेम करतो असं म्हणणं १०० टक्के बरोबर ठरणार नाही. हृदयावर फक्त प्रेम करणं वेगळं आणि हृदयाची काळजी घेणं पूर्णतः वेगळं. आपण आपल्या मोबाईल, कॉम्प्युटर , स्कूटर या सारख्या निर्जीव वस्तूंची देखील जास्त काळजी घेतो. पण हृदयाच्या कुरबुरींकडे जाणीवपूर्वक लक्ष देतो का ? हा सुद्धा आज विचार करायचा आहे.

 

आपण विकसनशील देशाचे नागरीक आहोत. आजही आरोग्याच्या प्राथमिक आणि अत्यावश्यक गरजा पूर्ण होताहेत असं नाही. अद्यावत रुग्णालये, प्रशिक्षित डॉक्टर्स, दळणवळणाची साधने, वाहतुकीच्या सोईसुविधा इत्यादी देशातल्या कानाकोपऱ्यात पोहचल्या असं आजही आपण ठामपणे म्हणू शकत नाही. भारत हा खेड्यांचा देश आहे. त्यामुळे अश्या रुग्णांना शहरात आणेपर्यंत बराच उशीर होतो आणि प्राणास मुकावं लागतं. १९९० मध्ये भारतात हृदयरोगाने मरणाऱ्यांचं प्रमाण २.२६ दशलक्ष इतकं होतं तर २०२० मध्ये ते ४.७७ दशलक्षापर्यंत पोहचलं आहे. म्हणजे मागील ३० वर्षात ते ५० टक्क्यांनी वाढलं आहे आणि हे प्रमाण सगळ्यांना हादरवून टाकणारं आहे. आपल्या भारतात शहरी भागात हृदय रोगाचा प्रादुर्भाव मागील काही वर्षात एका टक्क्यावरून १३.२ टक्क्यांवर व ग्रामीण भागात पण १.६ टक्क्यावरुन ७.४ टक्क्यांपर्यंत ह्या जीवघेण्या रोगानं उच्चांक गाठला आहे. आपल्या देशात जानेवारी ते जून २०२१ पर्यंत दरमहिण्याला जवळपास ३००० रुग्णांचा मृत्यू ह्या बिमारीने झालेला आहे.

 

खरं पाहता आपल्या कुटुंबातील , आप्त परिवारातील किंवा मित्रमंडळीतील एखादी व्यक्ती जेव्हा अशी आकस्मिकपणे निघून जाते तेव्हा त्याच्या जिवलगांच्या मनाची अवस्था काय होते हे शब्दात मांडता येणार नाही. पण आताशा अशा प्रसंगांना सगळ्यांनाच वारंवार सामोरे जावे लागत आहे. ‘ लॅन्सेट ‘ या जागतिक किर्तीच्या वैद्यकीय नियतकालिकात दिलेल्या अहवालानुसार १९७० पासून हृदयासंबंधी विविध आजारांमध्ये भारतात लक्षणीय वाढ झाली आहे. २०३० पर्यंत जगात अशा रुग्णांची संख्या २३ दशलक्ष इतकी वाढेल म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त जी भयावह अशीच म्हणावी लागेल.

 

भारतात हृदयरोग बळावण्याची कारणे –

फार पूर्वी हा समज होता की हृदयरोग हा फक्त सत्तरी पार केल्यानंतर येणारा आजार आहे आणि तो फक्त शहरात राहणाऱ्यांचाच आजार असून श्रीमंत व्यक्ती किंवा सुखात लोळणाऱ्यांना हा आजार होतो. पण हे समज खोटे ठरवत हृदयरोगानं जीव गमावणाऱ्यांची वयोमर्यादा वीशी – तिशित पोहोचली आहे. खेड्यापाड्यातनं मृत्यूचं प्रमाण लक्षणीय वाढतंय, तर गोरगरिबांच्या रित्या आयुष्यातही हा आजार वारंवार डोकावू पाहतोय. ह्या आजाराने ४० टक्के पुरुष मृत्युमुखी पडताहेत तर स्त्रियांचही प्रमाण दिवसेंदिवस वाढतय. पूर्वी रजोनिवृत्तीनंतरच स्त्रीयांना हृदयरोग होऊ शकतो असा समज होता पण बदलत्या जीवनशैलीने स्त्री बरोबरीने कार्पोरेट जगतात काम करतेय. व्यसनाधीनता वाढतेय, ताणतणाव, ओढाताण आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे स्त्रियांमध्येही हार्ट अटॅकचं प्रमाण वाढीला लागलं आहे.

 

मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. तरुणाईची झपाट्यानं बदलणारी जीवनपद्धती ज्याला कौतुकानं आपण ‘ लाईफस्टाईल ‘ म्हणतो तीच या आजाराचं मुख्य कारण ठरतेय. प्रदूषण, धावपळ, दगदग, प्रचंड ताणतणाव, पुरेशा झोपेचा अभाव, खाण्यापिण्याच्या नियोजनाचा अभाव, व्यसनाधीनता यामुळे तरुणाई या आजाराला बळी पडतेय. काहीतरी अचिव्ह करायचं, तेही इतरांच्या आधी. ही संकल्पनाच जीवघेणी ठरते आहे.

हृदयरोगाच्या कारणात लठ्ठपणा हे महत्वाचे कारण म्हणता येईल. अर्थात शिडशिडीत बांध्याच्या व्यक्तीला हा आजार होत नाही असं नाही. व्यसनाधीनता हे मुख्य कारण आपल्याला सांगता येईल. मध्यपान, धुम्रपान, तंबाखू, गुटखा ही मृत्यूच्या जाळ्यात ओढणारी व्यसनं आहेत. सिगारेटच्या व्यसनात केवळ व्यसनी व्यक्ती स्वतःचेच नव्हे तर आपल्या कुटुंबाचे आयुष्यही पणाला लावीत असतो.

उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, पक्षाघात, मधुमेह, थायरॉइट हे चयापचयाचे मेटाॅबोलिक सिंड्रोम आजार हातात हात घालून वाढायला लागतात. यातले ८० टक्के आजार हे वेळीच दखल घेतल्यास कमी होऊ शकतात व हृदय रोगावर चाप बसू शकतो. हृदयरोग हा अनुवांशीकतेने सुध्दा मिळू शकतो. जनजागृतीने आपण अनेक रुग्णाचे प्राण वाचवू शकतो. आणि ही आपल्यासाठी फार मोठी उपलब्धी राहील.

हार्ट अटॅक म्हणजे काय ?

हृदय हे निसर्गाने दिलेलं असं अवयव आहे की, आपल्या जगण्याची सुरुवात त्याच्या स्पंदनाने व जीवनाचा शेवट त्याची स्पंदने थांबल्यांनी होतो. त्याची धडधड असेल तर आपण जिवंत व नसेल तर आपण मृत. पण हे हृदय जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड धडधडतं कसं ? आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवातील प्रत्येक पेशिपर्यंत रक्त पोहचविण्याचं काम हे हृदयाच्या स्पंदनाने होते. हृदय हे एक सुदृढ मांसपेशी असलेला नैसर्गिक पंप आहे जो शरीरातील अशुद्ध म्हणजेच वापरलेले रक्त उजव्या बाजूंनी आत घेते व ते फुफ्फुसात पाठविते. डाव्या बाजूने फुफ्फुसात शुद्ध झालेले ( oxygeneted ) रक्त आत घेऊन संपूर्ण शरीरातील इंद्रिय व त्यातील पेशींना प्राणवायू पुरविण्यासाठी पाठविते.

 

संपूर्ण शरीराला अखंड रक्त करणाऱ्या ह्या हृदयाला स्वतःच्या जगण्यासाठी पण रक्त पाहिजे असते. हे रक्त ज्या रक्तवाहिन्यांतून त्याला पुरविल्या जाते त्याला कोरोनरी रक्तवाहिन्या ( coronary arteries ) असं म्हणतात. अशा तिन रक्तवाहिन्यांतून आलेल्या रक्त पुरवठ्यावर हृदयाच्या स्पंदनाचे काम सुरु असतं. हृदयाला रक्त पुरविण्यासाठी ह्या रक्तवाहिन्यांची पोकळी अबाधित असणे आवश्यक आहे. ही पोकळी शरीरातील कोलेस्टेरॉल ( cholesterol ), ट्रायग्लिसेराइट्स ( Triglycerides) वाढल्या मुळे व त्यांचे कण ह्या रक्तवाहिनीत साठल्यामुळे हृदयाचा रक्तप्रवाह कमी होत जातो. असेच होत राहिल्यास रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे हृदयाचा रक्तप्रवाह पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते. व त्या स्पंदनात अडथळा येऊ शकतो किंवा ते बंद पडू शकतं ह्यालाच हार्ट अटॅक किंवा हृदय विकाराचा झटका असं म्हणतात. शेवटी ते शरीर व मनांवर राज्य करणारं हृदयच. त्याला काही झालं की आपल्या जीवनाची नैया डगमगायला लागेलच.

हृदयाला आपल्यापासून दूर कसे ठेवता येईल ?

हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी आपलं शरीर आणि मन दोन्हीही सुदृढ व शुद्ध ठेवण्याची फार गरज असते. मन प्रसन्न असेल आनंदी असेल तर ताणतणावांपासून आपण दूर राहू शकतो. कामाच्या व्यापातूनही स्वतःचे छंद जोपासून त्यातनं आनंद मिळविणं यासारखं मनाचं औषध नाही. नियमीत व्यायाम, सकस आहाराला प्राधान्य, पुरेशी झोप, प्राणायाम, योगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्व्यसनीपणा हे सगळे अंगीकारले की हृदयरोगाला आपल्याजवळ येताच येणार नाही. भारतातील काही प्रगत राज्ये जसे पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू यात सुखासीनमुळे हृदयरोगाचे प्रमाण बरेच वाढतांना दिसून येत आहे. उलटपक्षी केरळ मध्ये जागरुकतेने हे प्रमाण कमी झाले आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर पहिला तास हा गोल्डन अवर ( Golden Hour) म्हणून ओळखल्या जातो. त्यावेळी जर रुग्णाला अस्परीन (Aspirin)आणि साॅरबीट्रेटची( Sorbitrate) गोळी दिल्या गेली. तर तो रुग्ण शहरात आणेपर्यंत रोगाची तीव्रता कमी केल्या जाऊ शकते. वेळीच उपचार मिळाले तर आपल्या अमूल्य जीव वाचू शकतो.

 

आपल्या देशात आजही आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे प्रमाण नगण्यच आहे. दारिद्रय, बेकारी, उपासमार, शिक्षणाचा अभाव यामुळे नियमीत शारीरिक तपासणी करण्यासंबंधी जागृती तर नाहीच, पण अनास्था आहे. खेड्यात अश्या सोई नाहीत. औषधोपचार महागला आहे आणि तीची उपलब्धताही होऊ शकत नाही. आपल्याकडे दर माणशी औषधोपचारावर होणारा खर्च देखील इतर देशांपेक्षा फारच कमी आहे आणि ही औषधे गरजूपर्यंत पोचविण्यास आपण कमी पडतोय. भारतात अजूनही ७० टक्के रुग्ण हे खाजगी डॉक्टर कडून औषधे घेतात. औषधाविना , निदानावाचून आणि उपचारावाचून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

सामुहिक प्रयत्नांची गरज –

हृदयरोग संबंधी जाणीव जागृती करतांना ही एक सामाजिक चळवळ म्हणूनच आपल्याला हाताळावी लागेल. ‘ ह्रदय स्वस्थ तर जीवन मस्त ‘ ही उक्ती अंगिकारत निरोगी जीवनाकडे वाटचाल व्हायला हवी. मुलांना सकस आहाराचे महत्त्व पटवून देताना फास्ट फूडचे दूरगामी घातक परिणाम सुध्दा सांगायला हवेत. सकस, समृध्द आहार म्हणजे सुदृढ शरीराची गुरुकिल्ली हे लहानपणापासूनच बिंबवायला हवे. आपल्याच अवयवांची नीट काळजी घेण्याचे हे बाळकडू त्याला घरातूनच मिळू शकते. ईश्वरावर विश्वास हा जगण्याचा ऑक्सिजन असतो, तेव्हा ही ध्यानसाधना करतांना मनावर लक्ष केंद्रीत करावं , हृदयावर प्रेम करावं.

यावर्षीच्या जागतिक ह्रदय दिनाच्या निमित्ताने ‘ दिल से दिल तक ‘ ही हाक सगळ्या समाजाला देऊया. हृदयाच्या या प्रेमळ स्पंदनांची गती कायम ठेवूया आपल्या धडधडत्या हृदयाची गाडी कोणत्या क्षणी थांबेल काही सांगता यायचे नाही. मग हृदयाला थोडी आपणच मदत करुया. आयुषमान भारत राष्ट्रीय आरोग्य योजना या सारख्या आशादायी प्रकल्पांना, योजनांना समजुन बळ देऊया राष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नांना प्रबळ करुया.

हृदयसिंहासनावर हा शब्द वापरणारे आपण, आणि त्या सर्वोच्च पदाचा मानही ठेवणारे आपणच. आपल्या शरीरातील या सगळ्यात महत्त्वाच्या अवयवाचीही तेवढीच काळजी घेऊया. ह्यासाठी आधी स्वतःवर म्हणजे आपल्या हृदयावर प्रेम करुया. जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने हे आवाहन करुया की आपले फिटनेसचे फोटो, व्हिडिओज, मॅसेजेस या दिवशी शेअर करुया, अगदी आपला डी.पी देखील आपल्या फिटनेसची साक्ष देईल असाच असायला हवा. आपल्याच जाणिवेतून, प्रयत्नातून ह्या जीवघेण्या आजाराला बाय बाय करुया.

डॉ. अशोक वासलवार
ashok_wasalwar@yahoo.co.in
पूर्वाध्यक्ष, असोशिएशन ऑफ फिजीशीयन्स ऑफ इंडिया, विदर्भ
चंद्रपूर