भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे “समाजभूषण” पुरस्काराने सन्मानित..

40

 

 

शुक्रवार, दि. १६ सप्टेंबर आज सकाळी नागपुर येथे धनोजे कुणबी समाज विकास महासंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, युवानेते देवराव भोंगळे यांना “समाजभूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

 

देवराव भोंगळे यांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या घुग्घुसचे सरपंच म्हणून आपल्या राजकिय व सामाजिक जीवनाला सुरवात केली. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व शिक्षण समितीचे सभापती आणि त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशी जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. तर दुसरीकडे गावच्या भाजपा वॉर्ड कार्यकारिणीचा अध्यक्ष ते जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष असा ही यशस्वी प्रवास त्यांनी आजपर्यंत केला आहे.

 

सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी व्यक्तिशः धडपड, सामाजिक व राजकीय परिस्थितीची अचूक जाण, अभ्यासू मांडणी आणि हसतमुख व्यक्तीमत्व असलेले देवराव भोंगळे जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही सर्वपरिचित आहेत. घुग्घुसचे युवा सरपंच म्हणून गावाचा सर्वांगीण कायापलट असो, पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी तालुक्यात शैक्षणिक तसेच ग्रामविकासाच्या दृष्टीने केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी असो किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून गरजू लाभार्थ्यांना वैयक्तिक योजनांतून लाभ मिळवून देणे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मिशन नवचेतना व नवरत्न सारख्या स्पर्धा सुरू करणे असेल अशा विविध कार्यांतून त्यांनी आपली अभ्यासू धडपड दाखवून दिली.

 

यासोबतच रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मेवाटप, भव्य रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जेष्ठांचा सन्मान, कोरोणा काळात अविरत मदत, कोरोणा योद्ध्यांचा सत्कार असे अनेकानेक सामाजिक उपक्रम सुद्धा त्यांनी आतापर्यंत राबविले आहेत.

त्यांच्या या संपूर्ण कार्याचा गौरव करण्यासाठी आज धनोजे कुणबी समाज विकास महासंघाच्या वतीने त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.