
सावली(सूरज बोम्मावार)
सावली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत चकपिरंजी मध्ये जिल्हा परिषद शाळा चकपिरंजी येथील कीचन शेड दुरुस्ती साठी 30 हजाराची रक्कम उचलून दोन महिने होवून ही काम न केल्याने पैशाची अफरातफर झाले असल्याचा संशय व्यक्त केल्या जात असून चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरुडवार यांनी केली आहे.

जुलै २०२२ या कालावधी मध्ये ग्रामपंचायत चकपिरंजी कडून जिल्हा परिषद शाळा चकपिरंजी येथील किचन शेड दुरुस्ती करिता ३०,००० रु. खर्च करण्यात आले असे दाखवून पैसे काढण्यात आले.
परंतु आज दिनांक १६ सप्टेंबर २०२२ पर्यंत त्या ठिकाणी काहीच काम न झाल्याने त्या कामासाठी उचल केलेली रक्कम गेली कुठे?यात सरपंच व सचिव यांनी संगनमत करून काही आर्थिक गैरव्यवहार केला का? असा प्रश्न निर्माण होत असून त्या प्रकरणी मौका चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. व यात दोषी वर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरुडवार यांनी केली असून तसे पत्र त्यांनी नामदार सुधिर मुंगनगंटीवार मंत्री चंद्रपूर,मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. चंद्रपूर,संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती सावली यांना दिले आहे.
प्रतिक्रिया….
कसलाही गैरप्रकार झाला नाही-ग्रामसेवक
चकपिरंजी ग्रामपंचायत मध्ये ऑनलाइन बिल मारताना ती तांत्रिक चूक झालेली असून त्यात कसलाही गैरप्रकार झालेला नाही.पावसामुळे काम करणे बाकी होते ते लवकरच सुरू करू अशी प्रतिक्रिया ग्रामसेवक भावना भानारकर यांनी दिली.
