लाखो रुपये गळप करून मुसळे कंपनीचा पेटी कंत्राटदार फरार?; मजुरावर उपासमारी

48

 

 

सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द पासून ६ किमी अंतरावर असलेल्या चक विरखल येथील ४० मजुरांनी गोसीखुर्द प्रकल्प अंतर्गतच्या असोला मेंढा तलावाचे मुख्य नहराचे कालव्याची दुरुस्ती व सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचे कामावर गेलेल्या मजुराचे पंधरा दिवसाची मजुरी अंदाजे तीन लाख रुपये एवढी रक्कम घेऊन मुसळे कंपनीचा ठेकेदार फरार झाल्याने मजुरावर उपासमारीची पाळी आलेली असून मजूर मजुरी मिळावी याकरिता दोन महिन्यापासून मुसळे कंपनीकडे हेलपाटा मारीत आहेत.

गोसीखुर्द सिंचन प्रकल्पा अंतर्गतच्या असोला मेंढा तलाव मुख्य नहर ते उपनहराचे दुरुस्ती व कॉंक्रीटीकरण करण्याचे काम मुसळे कंपनी नागपूर यांचेकडे देण्यात आले असून या कंपनीने वेगवेगळ्या पेटी कंत्राटदार मार्फत नहराचे दुरुस्ती व कॉंक्रीटीकरणाचे काम करण्याचा ठेका दिलेला आहे.

असोला मेंढा तलाव ते सावली भेजगाव कडे जाणारा जवळपास ४० किमी अंतर असलेल्या नहर तर तीन कवाडी पासून तर कापसी उपरी पर्यंतच्या जवळपास ४० किमी अंतर असलेला मुख्य नहराचे दुरुस्ती कॉंक्रीटीकरणचे काम सुरु होते. चक विरखल येथील एकूण ४० मजुरांना व दोन मिस्त्री मजुरांना मुसळे कंपनीच्या ठेकेदारांनी प्रति मजूर प्रति दिवस ४०० रुपये मजुरी ठरवून कामावर घेतले तर मिस्त्री काम करणाऱ्या मजुराकरिता प्रति दिवस प्रति मिस्त्री ५०० रुपये एवढा दर ठरविण्यात आला. ठरल्याप्रमाणे मजूर कामावर रुजू झाले. माहे एप्रिल ते जून महिन्यापर्यंत काम करण्यात आले. सुरुवातीला मजुरांची मजुरी मुसळे कंपनीने ठेकेदाराच्या मार्फत दिले. परंतु माहे मे, जून महिन्यातील दोन हफ्ते मजुरी देण्याकरिता विलंब करण्यात आला.

मजुरी करीता विलंब झाल्याने आणि काम बंद केल्याने मजुरांनी मुसळे कंपनीच्या पाथरी – करगाव येथे असलेल्या कार्यालयीन जबाबदार अधिकाऱ्याकडे जाऊन विचारणा केली असता तर मुसळे कंपनीकडून मजुरी देण्यात असून ठेकेदाराच्या खात्यावर जमा केली आहे. त्यांचे कडून मजुरी मिळेल असे सांगण्यात आले. त्यावेळेस ठेकेदार हजर नव्हते. त्यामुळे त्यांचेशी प्रत्यक्ष बोलता आले नाही. परंतु मुसळे कंपनीच्या अधिकाऱ्यावर विश्वास ठेवून मजूर घरी परत आले. आज जवळपास एक ते दीड महिना झालेला असतांना मजुरीची रक्कम देण्यात आलेली नाही. मजुरांनी मुसळे कंपनीकडे वारंवार विचारणा केला तेव्हा मजुरीचे पैसे ठेकेदाराकडे जमा केले, मजुरी देण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. तुम्ही त्यांचेशी संपर्क करा असे सांगून मुसळे कंपनीने हातवर केले. परंतु गोसीखुर्द सिंचन प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम करण्याची जबाबदारी मुसळे कंपनीची आहे. मुसळे कंपनीने कुण्या ठेकेदाराचे मार्फत काम केले हे मजुरांना माहित नाही. ठेकेदाराचे मार्फत काम करणे हे मुसळे कंपनीचे वैयक्तिक काम आहे. परंतु कामावर असलेल्या मजुरांना मजुरी देणे हि जबाबदारी मुसळे कंपनीची आहे. पण मुसळे कंपनीने ठेकेदाराचे वैयक्तित खात्यावर मजुरीचे पैसे जमा केले आणि लाखो रुपये घेऊन ठेकेदार फरार झाला.

यालाही मुसळे कंपनी जबाबदार असून कामावर असलेल्या ४० मजुरांचे लाखो रुपये मुसळे कंपनीने द्यावे अशी मागणी मजुरांनी केले असून मजुरांची मजुरी आठ दिवसात न दिल्यास ४० मजुरासह मुसळे कंपनीच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गोपाल रायपुरे यांनी दिला असून या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी, कामगार कल्याण मंडळ व पाथरी पोलीस स्टेशन येथील ठाणेदार यांना दिला आहे.