Home
Homeमहाराष्ट्रचंद्रपूर विमानतळाचे काम तीन महिन्यात सुरु करा ;आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

चंद्रपूर विमानतळाचे काम तीन महिन्यात सुरु करा ;आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

 

 

मुंबई : आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळावी यादृष्टीने तसेच जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या आणि वाघांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा विहीरगाव व मुर्ती येथे प्रस्तावित विमानतळाचे काम येत्या ३ महिन्यात सुरु व्हावे, यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय मान्यतांची तातडीने पूर्तता करावी अशा सूचना माजी अर्थमंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मौजा विहिरगाव व मुर्ती येथे विमानतळ व्हावे यासाठी दिनांक २४ एप्रिल, २०१६ ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. याकरिता शासनाकडून ४६ कोटी रुपये मंजूर झाले; यामध्ये ४१ कोटी रुपये जमीन अधिग्रहण व ५ कोटी रुपये प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यासाठी तरतुद करण्यात आली होती. विमानतळाकरिता एकूण ८४० एकर जमीन आवश्यक होती. त्यात पहिल्या टप्प्यामध्ये ७२० एकर जमीन अधिग्रहीत करून २५०० मीटरच्या धावपट्टीचे काम निर्माणाधीन असेल व दुसऱ्या टप्प्यानंतर धावपट्टीची लांबी ३००० मीटर होईल असा प्रस्ताव आहे.

परंतु, प्रशासकीय मान्यतेनंतरही अनेक वर्षांपासून या प्रकल्पाकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होते, विमानतळाच्या कामाला होत असलेल्या दिरंगाईची गंभीर दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवार, दिनांक ६ जुलै २०२२ रोजी विधानभवनात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून सविस्तर चर्चा केली. प्रकल्पाशी संबंधित अडचणी समजून घेतल्या; वन विभागाशी संबंधित असलेल्या समस्यांवर देखील मार्ग काढून या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

महाराष्ट्र शासनाकडून चंद्रपूर विमानतळाच्या कामासाठी स्थगिती दिल्याचे दिसून आल्याचे लक्षात आल्याने तातडीने ही स्थगिती उठवून कामाला गती देण्याच्या स्पष्ट सूचना आ. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. येत्या ऑक्टोबर महिन्यात विमानतळाचे भुमीपूजन होईल या दृष्टीने वेगाने पावले उचलण्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, मुख्य वनसंरक्षक तथा सहसचिव श्री रविकिरण गोवेकर, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे श्री मंगेश कुलकर्णी, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक श्री. प्र. ज. लोणकर आदी अधिकारी उपस्थित होते.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !