गोंडवाना विद्यापीठाची निवडणूक 14 ऑगस्टला !

40

● चंद्रपूर
गोंडवाना विद्यापीठाने गुरुवार, १६ जून रोजी विविध प्राधिकरणांच्या निवडणुकीचा बिगुल फुंकला असून, सविस्तर निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार १४ ऑगस्टला सर्वच निर्वाचन गणांची निवडणूक होणार असून, १७ ऑगस्टला मतमोजणीनंतर लगेच निकाल घोषित होईल. त्यामुळे आता विविध पक्षांच्या पॅनल्समध्ये निवडणुकीचा अक्षरश: धुराळा उडणार आहे.

मागील दोन महिन्यांपासून विविध विद्यार्थी संघटना आणि त्यांना सहकार्य करणारे राजकीय पक्ष नोंदणीच्या कामात गुंतले होते. मेच्या ३१ तारखेला ती मुदत संपली. पदवीधरांच्या गणातील ‘ब’ अर्ज भरण्याची मुदत लवकरच दिली जाणार आहे. पदवीधर, शिक्षक, प्राचार्य आणि व्यवस्थापन मतदार
संघाच्या निवडणुकीतून सिनेटची निवड होणार आहे. या सर्व निर्वाचन गणांच्या तात्पुरत्या मतदार याद्या येत्या २७ जून रोजी विद्यापीठाकडून प्रसिद्ध केल्या जातील.

एकदा या याद्या प्रसिद्ध झाल्या की, त्यातील काही नावांची गळती झाली असल्यास अथवा चुकीची नोंद झाली असल्यास त्याबद्दल २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कुलसचिवांकडे आक्षेप नोंदवता येणार आहे. या आक्षेपांचे निराकरण करून ४ जुलै रोजी कुलसचिव यादी प्रसिद्ध करतील. मात्र, त्यानंतरही अपेक्षित निराकरण झाले नाही असे वाटल्यास ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत या सर्व दुरुस्त मतदार याद्यांवर कुलगुरूंकडेही आक्षेप नोंदवता येणार आहे. या आक्षेपांवर १२ जुलै रोजी कुलगुरू अंतिम निर्णय देतील आणि त्यानंतर १३ जुलैला सर्व निर्वाचन गणांची अंतिम मतदार यादी जाहीर होईल.

२८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध निर्वाचन गटाच्या सदस्य निवडीसाठी उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. २९ जुलै रोजी या अर्जांची छाननी होईल आणि वैध उमेदवारांची यादी ३० जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. १ ऑगस्टला ५ वाजेपर्यंत उमेदवारी अर्जाच्या छानणीनंतर कुलगुरूंकडे अपिल दाखल करता येईल. २ ऑगस्टला त्या अपिलांवर कुलगुरू निर्णय देतील आणि ३ ऑगस्ट रोजी
सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवाराला त्याचा अर्ज परत घेता येणार आहे. शेवटी ४ ऑगस्ट रोजी विविध निर्वाचन गटासाठी उमेदवार असलेल्या व्यक्तींची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आणि स्वतंत्ररीत्या घोषित अतिसंवेदनशील मतदार केंद्रात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ
दिली गेली आहे. १७ ऑगस्ट रोजी सर्व निर्वाचन गटांचा निकाल घोषित होईल आणि ३० ऑगस्ट पूर्वी नव्या सिनेटची घोषणा होईल. 1 (तभा वृत्तसेवा)