
##################################################################################

गडचिरोली,ता.१: अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलिस ठाण्यात कार्यरत राज्य राखीव दलाच्या एका जवानाने सहकारी जवानावर गोळी घालून त्याची हत्या केली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
बंडू नवथर आणि श्रीकांत बेरड अशी मृत्यूमुखी पडलेल्या जवानांची नावे आहेत. श्री.नवथर हे २००७ च्या बॅचचे हवालदार होते, तर बेरड हे २०१४ च्या बॅचचे शिपाई होते. आज दुपारी नवथर हे दोन तासांचे कर्तव्य बजावून आराम कक्षात गेले. काही वेळातच शिपाई बेरड यांनी नवथर यांच्यावर पाठीमागून पाच गोळ्या झाडल्या आणि नंतर आराम कक्षाच्या बाहेर जाऊन स्वत:वर गोळी झाडली. यात दोघांचाही मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती आहे.
जिमलगट्टाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर घटनेचा तपास करीत आहेत.
