डिझेल टँकर व ट्रकचा भीषण अपघात 9 जणांचा होरपळून मृत्यू

41

 

अजयपूर जवळ घडला भिषण अपघात

चंद्रपूर – मूल मार्गावरील अजयपूरजवळील रिव्हरव्ह्यूजवळ येथे लाकडांनी भरलेला ट्रक MH 31 CA 2770 व डिझेल टँकर MH 40 BG 4060 समोरासमोर धडकले. या अपघातानंतर भीषण आग लागून दोन्ही वाहनांतील चालकांसह 7 मजुरांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा अपघात गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मूलमार्गावरील अजयपूर गावाजवळ घडला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास लाकूड भरलेला ट्रक चंद्रपूरच्या दिशेने जात होते. तर, डिझेल भरलेला एक टँकर चंद्रपूरकडून येत होता. दरम्यान, अजयपूरजवळ या दोन्ही वाहनांची धडक होऊन आग लागली. यावेळी एका वाहनात लाकूड व दुसऱ्या वाहनात डिझेल असल्याने जोरदार भडका उडाला. यावेळी लाकडू असलेल्या वाहनातील चालकासह 6 मजूर, डिझेल असलेल्या वाहनातील तिघेजण अशा एकूण 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

 

लाकडे वाहून नेणाऱ्या ट्रक मधील चालक अक्षय सुधाकर डोंगरे (30) बीटीएस प्लॉट बल्लारशाह येथील आहे. तर मजूर प्रशांत मनोहर नगराळे (28), कालू प्रल्हाद टिपले (35), मैपाल आनंदराव मडचापे (24),बाळकृष्ण तुकाराम तेलंग (40),साईनाथ बापूजी कोडापे (35), संदीप रवींद्र आत्राम (22) सर्व राहणार बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली व कोठारी येथील होते. टँकरचालक हाफिज खान (38) अमरावती, मजूर संजय पाटील (35) वर्धा अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
या अपघातामुळे संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने मूल व चंद्रपूर मार्गावरील वाहतूक खंडित झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळ गाठले.

तसेच, चंद्रपूर, बल्लारशा, सीटीपीएस चंद्रपूर, पोंभूर्णा, मुल येथून अग्निशमन वाहन बोलाविण्यात आले. आग आटोक्यात आली असली तरी आज सकाळी 9 वाजेपर्यंत टँकर जळतच होता. सकाळीच अग्निशमन गाडीने पुन्हा आग विझवण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून सर्व जळालेले मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहेत.