रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते,जिबगांव साखरी-सावली मार्गाची दुरावस्था

47

 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष?

सावली तालुक्यातील जिबगांव, हरांबा ,लोंढोली,साखरी मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून डांबरीकरण अनेक ठिकाणी उघडलेले आहे. या मार्गावरील मोठे खड्डे धोकादायक ठरत आहेत. यामुळे या मार्गावरून जाताना अपघात होण्याची शक्यता बळावली असून सार्वजनिक बांधकाम विभाग सावली दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.

सावली येथे तहसील,पंचायत समीती,बँका,शाळा, महाविद्यालये, पत संस्था,उपरुग्नालय ,दवाखाना, बाजारपेठ अन्य शासकीय कार्यालये सावली येथे असल्याने जिबगांव,उसेगांव,सिर्सी,साखरी,लोढोली, हरांबा,उपरी,कापसी,आदी या गावातील लोकांची सावलीला दररोज ये-जा असते. तसेच रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणात वाहनाची रेलचेल सुरू असते.

सावली तालुक्याला जोडणारा हा रस्ता गावांसाठी मुख्य मार्ग असल्याने दुचाकी-चारचाकी या मार्गे जास्त प्रमाणात जात येत असतात.जिल्हा महामार्ग सोडले तर तालुक्यातील अनेक गावात रस्त्याचे खड्डेमय विकास पाहायला मिळतो.नूतनीकरण नाहीतर कमीत कमी खड्डे तरी बुजवावीत ही मागणी वाहन धारक करत आहेत.तयार झालेल्या रस्त्याची दुरुस्ती तर दूरच पण साधं खड्डे सुद्धा बुजवले जात नाहीत. त्यामुळे रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य झाले असून रस्त्यांवर दुरवस्था झाली आहे.

रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण उघडले असून दोन ते तीन फुटाचे पसरट खड्डे पडले आहेत. मात्र या मार्गावर मोठे खड्डे पडले असून वाहन चालकास वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते रस्त्याची एवढी दुरवस्था झाली आहे तेव्हा प्रशासनाने नागरिकांची तालुका स्थळी येण्याकरिता होणारी फरपट थांबवावे अशी मागणी जोर धरत आहे.
प्रशासनानी याकडे लक्ष देऊन निदान डागडुगीचे तरी काम करावे व मार्ग सुरळीत करून द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.