
पदाधिकारी व संचालकांची पत्रकार परिषदेत माहिती

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागील काही वर्षांत नफ्याकडे वाटचाल सुरू केली असून, बँकेच्या भांग भांडवलातही मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे एनपीए कमी करण्यात मोठे यश आले आहे.
बँकेचा सकल एनपीए मार्च २०२२ अखेर ७.८९ टक्के आहे. मागील दहा वर्षांच्या तुलनेत हा एनपीए सर्वात कमी असून बँकेचा निव्वळ एनपीए मागील वर्षी ५.७५ टक्के होता. तो मार्च २०२२ अखेर शून्य टक्क्यावर आला आहे. बँकेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी असून, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात बँकेचे विद्यमान पदाधिकारी, संचालकांच्या सहकार्यानेच हे यश असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत आणि संचालकांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत दिली. बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
२०२१-२२ करिता बँकेला ४६३ कोटींचे पीककर्जाचे उद्दिष्ट होते. बँकेने ६८ हजार ४६२ शेतकऱ्यांना ५१२.४७ कोटींचे कर्ज वितरित केले आहे. तर यावर्षी साडेपाचशे कोटीचे बँकेचे उद्दिष्ट्ये असल्याचे अध्यक्ष रावत यांनी सांगितले. बचत गटांना कर्ज वाटपातही बँक राज्यात अग्रेसर आहे.
यासाठी बँकेला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. बँकेचे भांडवल १२८.४२
कोटी अहे. मागील वर्षीच्या तुलनेत ८.९७ कोटींने भागभांडवलांत वाढ झाली आहे. बँकेच्या राखीव निधीतही ३९.२५ कोटीने वाढ झाली आहे. बँकेच्या ठेवी ३१ मार्च
२०२२ अखेर ३४९. ४० कोटी असून, मागील वर्षीच्या तुलनेत ९२.०३ कोटीने वाढ झाली आहे. तर व्यवस्थापन खर्च २ टक्के अपेक्षित असताना बँकेने व्यवस्थापन खर्चसुद्धा कमी करून १.८४ टक्क्यावर आणला आहे ही मोठी उपलब्धी असल्याचे रावत यांनी सांगितले. बँकेच्या प्रती शाखा व्यवसायातही मोठी वाढ झालेली आहे.
बँकेचा सकल एनपीए २०१९-२० मध्ये २७.५६ टक्के होता तो मार्च २०२२ अखेर केवळ ७.८९ टक्क्यावर आणण्यात यश आले आहे. तर निव्वळ एनपीए ५.७५ टक्क्यावरून शून्यावर आणण्यात यश आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गरजू शेतकऱ्यांसाठी शेतकरी कल्याण निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून वर्षभरात ३१४ शेतकऱ्यांना ६४.७२ लाख प्रत्यक्ष मदतनिधीचे वाटप करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पत्रकार परिषदेला संतोषसिंग रावत यांच्यासह यशवंत दिघोरे, शेखर धोटे, रवींद्र शिंदे, संदीप गड्डमवार, पांडूरंग जाधव,
डॉ. विजय देवतळे, उल्हास करपे, संजय तोटावार, ललीत मोटघरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर उपस्थित होते.
