सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकास खासदाराची मारहाण ;अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

52

 

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून बाळू धानोरकर यांची ओळख आहे. पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार या संस्थेची निवडणूक 22 मे ला होणार आहे. त्यानुसार निवडणूकीची प्रक्रिया मंगळवारला भद्रावती येथील सहायक निबंधक यांच्या कार्यालयात सुरू होती. यावेळी तक्रारदार व्यवस्थापक गोविंद ठाकरे हजर होते. यादरम्यान खा. धानोरकर यांचा त्यांना फोन आला. आपण कुठे आहात असे विचारत त्वरित सहकारी संस्थेच्या कार्यालयात हजर व्हा असा आदेश त्यांनी दिला. त्यानुसार ठाकरे हे हजर झाले. यावेळी धानोरकर यांच्यासोबत 20 ते 25 कार्यकर्ते होते. धानोरकर यांनी ठाकरे यांना संस्थेचे महत्वाचे कागदपत्रे आणि यादी देण्याची मागणी केली.

 

यावेळी ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू असून संस्थेचे महत्त्वाचे कागदपत्रे नियमानुसार देता येत नाही, आपण ते निवडणूक अधिकाऱ्यांकडून घ्यावे असे म्हटले. यावर धानोरकर संतापले आणि त्यांनी शिवीगाळ करत, जर तू कागदपत्रे दिली नाहीत तर तुझे हातपाय तोडल्याशिवाय मी राहणार नाही अशी धमकी दिली. यावेळी धानोरकर यांच्या सुरक्षारक्षकाने त्यांना अडवले आणि पूढील अनर्थ टळला. मात्र यादरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

याबाबत व्यवस्थापक गोविंद ठाकरे यांनी संस्थेकडून तक्रार दिली असून त्यात सुधीर पिजदूरकर, सतीश नगराळे, राजू टाले, उमेश जीवतोडे यां कर्मचाऱ्यांच्या देखील स्वाक्षऱ्या आहेत. या प्रकरणी भद्रावती पोलिस ठाण्यात खासदार धानोरकारांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून ठाणेदार भारती यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या विरोधात विविध कलमान्वयेगुन्हा दाखल करण्यात आला आहे.