
सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या अठरा कि. मी. अंतरावरील गुंजेवाही येथील निसर्ग निर्मित डोंगरावर जागृत असलेल्या पुरातन काळातील अंबिका माता व यल्लम्मा माता मंदिरात दरवर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा शनिवारी चैत्र नवरात्र महोत्सव निमित्ताने घटस्थापना करण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जवळील टेकडीवर पुरातन काळातील जागृत देवस्थान आहे. त्यामध्ये दोन मंदिरे असून मोठ्या मंदिरात माता अंबिका व लहान मंदिरात माता यल्लम्मा यांचे बस्तान आहे. त्या मंदिराला लागून शंकराचे व विठ्ठल रुक्मिणी चे मंदिर आहेत. या मंदिराचे बांधकाम अंदाजे दोनशे वर्षांपूर्वी चे असल्याने त्या मंदिराचे सन १९९३ साली जिर्णोद्धार करून नवीन बांधकाम करण्यात आले.
तेव्हा पासून या ठिकाणी भावीक भक्तांची वरदळ अधिकच वाढत्या प्रमाणात दिसून येत आहे. या उत्सवाला तालुका तसेच जिल्ह्यातील अनेक जाती धर्माचे भाविक लोक हि माता आपल्या मनोकामना पूर्ण करते. हि आशा ठेऊन नवसे करतात आणि त्याचे उद्धापण म्हणून पांग फेडतात. देविचे उपासक दर मंगळवारी उपवास या निमित्ताने दर्शनासाठी या मंदिरावर येतात.
या मातेच्या कृपेने आपोआप भाविकांचे मनोरथ पूर्ण होत असल्याने या मंदिराची महती अधिकच वाढत आहे. हा मंदिराचा परिसर जंगल व्याप्त असल्याने दर चैत्र नवरात्राला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना समोरासमोर व्याघ्र दर्शन होत असल्याने अंबिका माता पावली अशा शब्दांत आनंद व्यक्त करुन मनोभावे पुजा करतात.
देवस्थान व्यवस्थापन कमिटीने बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांना राहण्याची व विश्रांती ची सोय उपलब्ध करून दिली असल्यामुळे दर्शनासाठी येणारे भाविक भक्त समाधान व्यक्त करुन व्यवस्थापन कमिटीचे आभार मानले जातात.
ह्याच मंदिराला सन १९६४ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भेट देऊन हे मंदिर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. हे पवित्र मंदिर साधुसंतांच्या आगमनाचे दिशा दर्शवित असल्याचे चिन्ह म्हणून ओळखले जातात. ह्या अंबिका माता व यल्लम्मा माता यांची प्रतिष्ठापना परशुरामाच्या काळात झाल्याची आख्यायिका आहे. या मातेच्या मुर्ती गंडकी पाषाणाच्या असुन तिचे रुप सिंहारुढ अष्टभुजा आहे.
तिच्या उजव्या स्कंधात चंद्र व डाव्या स्कंधावर सूर्य विसावला आहे.हि माता अनेक आयुधे धारण केलेली असून पाठीवर भाता व मुकूटाच्या मध्यभागी शिवलिंग, उजवीकडे सिंह असुन बाजुला साध्वीची प्रतिमा कोरली आहे. या करवासीनी महालक्ष्मी चे स्थान हे एक आदिशक्ती, आदिमाया, ब्रम्ह स्वरुपीनीचे स्थान एक आद्यपीठ आहे. या मंदिराचे बांधकाम पुरातन असून मोठ्या मंदिरात अंबिका मातेची व लहान मंदिरात यल्लम्मा मातेची मुर्ती लोभस दृष्टी स्थिर करणारी प्रसन्न करणारी मुर्ती आहे.
तिचा पेहराव सालस असुन मनाला मोहून टाकते. नवरात्र हा भावीक भक्तासाठी परवणीचा काळ प्रतिपदेला घटस्थापना, द्वितीयेला चौसष्ट व योगीनीचे मिलन, तृतीयेला देवीचा शृंगार, ललित पंचमीला उपवास, षष्ठीला गोंधळ, सप्तमीला सप्तश्रृंगी, अष्टमीला घागर फुंकले आणि नवमीला नवदिवसाचे पारणे फेडून नवरात्रीच्या नवदिवसाचे पुजन, आरती व विविध प्रकारचे कार्यक्रम करून महाप्रसादाने सांगता केली जाते.