
गडचांदूर – स्मार्ट ग्राम बिबी येथे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सकाळी वृक्षदिंडी काढून गावात वृक्ष लागवडीबाबत नुकतीच जनजागृती करण्यात आली. महिला डोक्यावर कुंडी व झाड घेऊन दिंडीत सहभागी झाल्या होत्या.

वृक्षदिंडीला अल्ट्राटेक सिमेंट आवारपूरचे युनिट हेड पी. श्रीराम यांनी हिरवी झेंडी दाखविली. तसेच यावेळी कर्नल दीपक डे, सतीश मिश्रा, सचिन गोवारदिपे, आनंदराव पावडे, कवडू पिंपळकर, रामदास देरकर यांची उपस्थिती होती. हनुमान नगर भारुड मंडळ व नवचैतन्य भारुड मंडळाच्या महिला मंडळींनी भजनाच्या माध्यमातून जनजागृती केली. समारोपीय कार्यक्रमात महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिताताई चिताडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी मंचावर प्रा. आशिष देरकर, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष नामदेव ढवस, राष्ट्रसंत पुतळा समितीचे अध्यक्ष विठ्ठल टोंगे, शामकांत पिंपळकर, अंजनाबाई काळे, कलावती देरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन भारती पिंपळकर यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. आशिष देरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गावातील महिलांनी सहकार्य केले.
