वेकोलिच्या सुब्बई प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी रोखली कोळसा वाहतुक

249

राजुरा, वार्ताहर –
वेकोलिच्या सुब्बई – चिंचोली प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी नोकरी आणि मोबदला द्यावा, या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक यांचे कार्यालयापुढे धरणे आंदोलन सुरू केले. आज सकाळी 9 वाजता पासून आंदोलक शेतकर्‍यांनी सास्ती तीन क्रमांकाच्या गेटवर कोळसा वाहतूक रोको आंदोलन केले. दुपारी पाच वाजेपर्यंत जड वाहतुक पूर्णपणे बंद आहे. अद्यापही यावर तोडगा निघाला नसल्याने ट्रक वाहतुक बंद आहे.

दिनांक 30 मार्च ला वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रीय महाव्यवस्थापक कार्यालयात सुब्बई-चिंचोली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हा प्रोजेक्ट बंद करण्यात येऊन रद्द करण्यात आल्याने अधिकार्‍यांनी नोकऱ्या देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे 12 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पातील 205 शेतकर्‍यांची निराशा झाली. आता वेकोलि प्रशासनाने त्यांच्या आयुष्यातील 12 वर्षे वाया घालवली, त्यामुळे संताप व्यक्त करीत पुन्हा या प्रकल्पाला मंजुरी मिळवून नोकरी व जमिनीचा मोबदला द्यावा, अशी या शेतकर्‍यांची मागणी आहे. काही राजकिय नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हे प्रकरण गुंतागुंतीचे केले आणि काहीही माहिती न देता वेकोलि सोबत लिखित समझोता केला, असाही आरोप या शेतकर्‍यांनी केला आहे. या आंदोलनात शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.